देऊळगाव राजा : तालुक्यातील दगडवाडी येथे २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. गुरुवारी सकाळी ही घटना समोर आल्यानंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणाचे नाव विशाल अजाबराव जायभाये (वय २५, रा. दगडवाडी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास विशाल याने घरातील स्लॅबला असलेल्या लोखंडी कडीला दोरी बांधून गळफास घेतला. काही वेळाने ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर देऊळगाव राजा पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणी सुकदेव कारभारी जायभाये (वय ६२, व्यवसाय शेती) यांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक १८/२०२६ अन्वये कलम १९४ बीएनएस अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहेत.