बुलढाणा : मर्दडी घाट परिसरात एका शेतकऱ्याला दुचाकी आडवी लावून अडवत चाकूचा धाक दाखवून लूट केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका आरोपीसह दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरुड (ता. बुलढाणा) येथील कचरुबा महादू जाधव हे २३ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे सव्वासहा वाजण्याच्या सुमारास बुलढाणा येथून आपल्या गावी परत जात होते. दरम्यान, मर्दडी घाटातील ढालसावंगी जवळील कमान गेट परिसरात दोन अज्ञातांनी त्यांच्या मोटारसायकलसमोर गाडी आडवी लावून त्यांना थांबवले. यावेळी सोमीनाथ श्रीराम शिंदे (रा. कधी टाकळी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हा विना नंबरच्या पल्सरवर घटनास्थळी आला. त्याने चाकू दाखवत जाधव यांच्याकडील रोख २ हजार रुपये जबरदस्तीने घेतले. त्याचवेळी सोबतच्या दोन अज्ञातांनी सुमारे ४२० रुपयांचे साहित्य असलेली थैलीही लंपास केली. घटनेनंतर जाधव यांनी धाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सोमीनाथ शिंदे व इतर दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पीएसआय परमेश्वर केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.