डोणगाव :- येथील खंडोबा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ७३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी ९ ते १३ एप्रिलदरम्यान घडल्याचे सांगण्यात येत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक २ मधील रहिवासी डॉ. गजानन प्रल्हादराव पातुरकर हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट उघडून सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले. यामध्ये अंगठ्या, झुमके, रिंग, नथ तसेच सुमारे २० ग्रॅम वजनाचे गंठण यांचा समावेश आहे. घरातील साहित्यही अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी डॉ. पातुरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी संजय धिके करीत आहेत. दरम्यान, चोरीस गेलेल्या दागिन्यांची प्रत्यक्ष बाजारभावानुसार किंमत अधिक असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.