लोणार :- तालुक्यातील देऊळगाव वायसा येथे शेतातील सौरपंपाशी संबंधित साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शेतकऱ्याचे सुमारे २२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंडीबा आश्रुबा सोनुने (वय ४४) यांच्या गट क्रमांक ३१३ मधील शेतात शासनाच्या अनुदानातून सौरपंप बसविण्यात आला होता. २ एप्रिल रोजी संध्याकाळी ते शेतातून घरी परतले होते. दरम्यान रात्री वादळी वातावरण असल्याने ते पुन्हा शेतात गेले नव्हते. ३ एप्रिल रोजी सकाळी शेतात गेल्यानंतर सौरपंपाच्या तीन प्लेटा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील पाहणीत विहिरीतील ३ एचपी सौरपंप, सुमारे ९० फूट पाइप व १२० फूट केबलसह इतर साहित्य चोरीला गेल्याचे उघड झाले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी गजानन सानप करीत आहेत.