खामगाव : तालुक्यातील गोंधनापूर येथे बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप आणि कपाटाचे लॉक तोडून तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ९ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासादरम्यान गोंधनापूर येथील दोन तरुणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद वसी मोहम्मद शफी (वय ४०, रा. गोंधनापूर) यांचा कांदा, कापूस व धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ९ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास ते कुटुंबासह लग्न समारंभासाठी घराबाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉक तोडून डब्यात ठेवलेली ५०० रुपयांच्या नोटांची ३ लाख ५० हजार रुपये आणि १०० रुपयांच्या नोटांची २ लाख रुपये, अशी एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. लग्न समारंभ आटोपून घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले आणि कपाटाची तोडफोड झाल्याचे दिसून आले. तपासणी केली असता रोकड चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३१ (३) अन्वये १० नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गोंधनापूर येथील दोन तरुणांना संशयावरून ताब्यात घेतले. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत (एमसीआर) रवानगी करण्यात आली आहे. या घरफोडी प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.
