मलकापूर : शहरातील गजबजलेल्या स्टेशन रोड परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महाराज कचोरी सेंटरमध्ये अंदाजे ४८ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळली. विशेष म्हणजे, मृताच्या उजव्या हातावर मराठीत ‘बिलीप’ असे गोंदलेले असून, याच खुणेच्या आधारे मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास स्टेशन रोडवरील महाराज कचोरी सेंटरमध्ये एक अनोळखी व्यक्ती निपचित पडलेली असल्याची माहिती डायल ११२ वर देण्यात आली. माहिती मिळताच उपनिरीक्षक शेख यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता संबंधित व्यक्ती कोणतीही हालचाल करीत नसल्याचे निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांकडे चौकशी करूनही त्याची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४८ वर्षे असून, त्याच्या उजव्या हातावर मराठीत ‘बिलीप’ असा शब्द गोंदलेला आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६०/२०२६, कलम १९४ बीएनएसएसनुसार नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास मलकापूर शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.