Headlines

काजूकतलीच्या डब्यात बुरशीसह जिवंत अळ्या! बुलढाण्यात एफडीएची रिलायन्स मॉलवर धडक

बुलढाणा : सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरात समोर आला आहे. रिलायन्स मॉलमधून खरेदी केलेल्या प्रसिद्ध सीताश्री-लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजूकतलीच्या डब्यात बुरशीसोबत चक्क जिवंत अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर एफडीएच्या पथकाने रिलायन्स मॉलवर धडक देत संबंधित मिठाईच्या साठ्याची तपासणी सुरू केली आहे.
तक्रारदाराने रिलायन्स मॉलमधून काजूकतलीचा बॉक्स खरेदी करून घरी नेला. बॉक्स उघडल्यानंतर मिठाईवर बुरशी पसरल्याचे दिसून आले. त्यानंतर बारकाईने पाहिले असता मिठाईमध्ये जिवंत अळ्या असल्याचे निदर्शनास आले. उत्पादनाच्या बॉक्सवर संबंधित बॅच नंबर आणि बारकोड असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडे तातडीने तक्रार करण्यात आली. तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी जी. के. वसावे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएच्या पथकाने रिलायन्स मॉलमध्ये पाहणी केली. यावेळी संबंधित उत्पादनाचा साठा, साठवणुकीची पद्धत तसेच उत्पादनाच्या कालबाह्यता तारखांची तपासणी करण्यात आली. सदोष आढळलेल्या मिठाईचा साठा जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, संबंधित काजूकतली किती दिवसांपासून विक्रीसाठी ठेवण्यात आली होती, या साठ्यातील किती बॉक्स ग्राहकांनी खरेदी केले आणि कंपनीकडून उत्पादनाच्या साठवणुकीसह गुणवत्ता नियंत्रणाचे नियम पाळण्यात आले होते का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एफडीएने मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.बआता प्रयोगशाळेच्या अहवालानंतर एफडीएकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना उत्पादनाची तारीख, बॅच नंबर, एक्सपायरी डेट आणि पॅकिंगची स्थिती काळजीपूर्वक तपासावी. संशयास्पद किंवा खराब उत्पादन आढळल्यास संबंधित विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!