जळगाव जामोद : भेंडवळ बुद्रुक शिवारात शेतकाम करत असताना विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन एका २४ वर्षीय युवकाचा विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संकेत निलेश ठाकरे (रा. चावरा, ता. जळगाव जामोद) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी १५ मे रोजी सकाळच्या सुमारास संकेत ठाकरे हा नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी गेला होता. शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट खोल विहिरीत कोसळला. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्याला बाहेर पडता आले नाही व त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, संकेत बराच वेळ घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी शेत परिसरात शोध घेतला. त्यावेळी विहिरीजवळ संशय आल्याने पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व मोठ्या प्रयत्नांनंतर युवकाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. ऐन तरुण वयात संकेतचा झालेला दुर्दैवी मृत्यू ठाकरे कुटुंबासाठी मोठा आघात ठरला असून, चावरा गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी भागवत उंबरहंडे करीत आहेत.