डिझेलअभावी शेतकऱ्यांची मशागत खोळंबली; मलकापूर तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप वाढला!

( उमेश ईटणारे )
मलकापूर :- तालुक्यात सध्या शेती मशागतीचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल उपलब्ध नसल्याच्या पाट्या झळकत असून, ज्या पंपांवर डिझेल उपलब्ध आहे तेथेही कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना मशागतीसाठी ट्रॅक्टर चालविण्यास अंदाजे ४० लिटर डिझेलची आवश्यकता असते. मात्र कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर घेऊन थेट पेट्रोल पंपावर जावे लागत आहे. त्यामुळे ये-जा करताना अतिरिक्त डिझेल खर्च होत असून, काही शेतकऱ्यांना केवळ पंपापर्यंत जाण्या-येण्यासाठीच सुमारे हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
दरम्यान, अनेक पंपांवर इंधनच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे रखडली आहेत. एकीकडे मोठ्या चारचाकी वाहनांना डिझेल दिले जात असल्याचा आरोप होत असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतीसाठी डिझेल नाकारले जात असल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून डिझेलचा तुटवडा नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवरील “डिझेल उपलब्ध नाही” या पाट्या वेगळीच परिस्थिती दर्शवत आहेत. शेती हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेल्या या संकटामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना सुरळीत डिझेल पुरवठा करावा, अशी मागणी जोर धरत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!