देऊळगावराजा : तालुक्यातील देऊळगावमही येथे जुन्या वादाच्या कारणावरून २४ वर्षीय तरुणावर धारदार वस्तूने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगावराजा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादी क्षेयश उर्फ दीप सुरेश पडघान (वय २४, रा. देऊळगावमही) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गावात जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. “तुला अटक का झाली नाही,” असा जाब विचारत वाद वाढविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर आरोपी रतन कोठारी यांनी फिर्यादीचा हात पकडून धरला, तर आकाश कोठारी यांनी धारदार वस्तूने छातीत वार करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच इतर आरोपींनीही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी आकाश रतन कोठारी, सुभाष रतन कोठारी, रतन कपूरचंद कोठारी आणि रंजना रतन कोठारी (सर्व रा. देऊळगावमही) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देऊळगावमही दूरक्षेत्रातून प्राप्त अहवालावरून देऊळगावराजा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास बिट पोलीस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत.