Headlines

अवैध रेती वाहतुकीवर एलसीबीची मोठी कारवाई; पाच टिप्परसह ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त! पाच जण ताब्यात

बुलढाणा : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पाच टिप्पर पकडले असून, तब्बल ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेहू परिसरात गुरुवारी मध्यरात्री ही धडक कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके सक्रिय करण्यात आली होती. दरम्यान, सावरगाव नेहू परिसरातून विनापरवाना टिप्परच्या सहाय्याने रेतीची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या पथकाने रात्री उशिरा नाकाबंदी करून सापळा रचला. या कारवाईत पाच टिप्पर अडवून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अवैधरित्या रेती वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी योगेश काळे, आकाश कंडारकर, शुभम इंगळे, लक्ष्मण चव्हाण आणि प्रल्हाद नरवाडे या पाच आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडून सुमारे ७५ लाख रुपये किमतीचे पाच टिप्पर तसेच १० ब्रास रेती असा एकूण ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात गौण खनिज कायदा व भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!