खामगाव:- शहरातील पुरवार गल्ली परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सात जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पुरवार गल्ली येथील एका घरात काही जण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकून जुगार सुरू असल्याची खात्री केली. या कारवाईत स्वप्नील भिकूलाल गांधी (वय ४०), आकाश विलास किलोलीया (वय ३३), अमोल शंकरराव कुकडे (वय ३६), निलेश सुभाष कल्याणकर (वय ३५), कृष्णाकुमार नंदकिशोर राठी (वय २८), मयुरेश मंगेश देशमुख (वय ३०) आणि मंगेश राजू बाभुळकर (वय २६, सर्व रा. खामगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडीत आरोपींकडून २६ हजार ३२० रुपये रोख रक्कम, सात मोबाईल फोन (किंमत ७८ हजार रुपये) तसेच ५२ पत्त्यांचे ताशपत्ते जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ४ हजार ४२० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल देवेंद्र शेळके यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करीत आहेत.