शेगाव येथे महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव
शेगाव येथे महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव
शेगाव: हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती तसेच दैनिक लोक युवा वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६ वितरण सोहळ्याचे आयोजन शेगाव येथे करण्यात आले. विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून पुरस्कारासाठी ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या ६२८ प्रस्तावांमधून निवड करण्यात आलेल्या १२५ मान्यवरांना राज्यस्तरीय महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी विजय कुळकर्णी, भाजपचे शहर अध्यक्ष चंद्रकांत घोराडे तसेच उद्योजक बाळासाहेब दामोदर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व संत गजानन महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक कार्य, राजकारण, कला, वैद्यकीय क्षेत्र, वकिली, उद्योग, अभिनय आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव झाल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशाच्या रक्षणासाठी आपले योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचाही यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. भजनी मंडळे व वारकरी बांधवांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. प्रकाश थाटे, सुधाकर तायडे, अमोल वानखेडे, मयूर लड्डा, देवेंद्र जयस्वाल व दत्तात्रय भोंडेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल केसकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.