बनावट गर्भवतीचा सापळा; तार कॉलनीत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, वर्षभरात बोगस डॉक्टर गवईविरुद्ध दुसऱ्यांदा कारवाई; पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह साहित्य जप्त

बुलडाणा : गर्भातील बाळाचे लिंग सांगण्यासाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्याचा आरोग्य विभागाने बनावट गर्भवती महिलेच्या माध्यमातून रचलेल्या सापळ्यात पर्दाफाश केला. बुलडाणा शहरालगतच्या सुंदरखेड येथील तार कॉलनी परिसरातील ‘बळीराम निवास’ येथे शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत अवैध गर्भलिंग निदानासह बेकायदेशीर गर्भपाताचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कैलास बळीराम गवई, विजय देवीचंद राठोड आणि साहील कैलास गवई यांच्याविरुद्ध बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम, वैद्यकीय गर्भपात अधिनियम तसेच बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कैलास गवई याच्याविरुद्ध वर्षभरात गर्भलिंग निदानाच्या प्रकरणात दुसऱ्यांदा कारवाई झाली आहे.
उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला मंडळ यांच्याकडे प्राप्त झालेल्या गोपनीय तक्रारीनंतर आरोग्य विभागाने या कारवाईची आखणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल गजानन रिंगे यांच्या फिर्यादीनुसार, १ ऑगस्ट रोजी डॉ. धनंजय चिमणकर, डॉ. विशाल येदवर, अॅड. शुभांगी ठाकरे, किरण जानुनकर आदींच्या संयुक्त पथकाने बनावट गर्भवती महिलेच्या माध्यमातून सापळा रचला. सापळ्यादरम्यान गर्भलिंग निदानासाठी २० हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर एजंट विजय राठोड याने एमएच-३०-बीएक्स-७०६४ क्रमांकाच्या दुचाकीवरून बनावट गर्भवती महिला आणि किरण जानुनकर यांना तार कॉलनीतील ‘बळीराम निवास’ येथे नेले. पथकाने तेथे छापा टाकताच राठोडकडून सापळ्यासाठी देण्यात आलेली २० हजार रुपयांची रक्कम जप्त केली. तसेच एमएच-२८-सीए-१८०९ क्रमांकाच्या अॅक्सेस स्कुटीमधून गर्भपाताच्या गोळ्यांचे रिकामे रॅपरही आढळून आले. कारवाईदरम्यान घरात पायल सुमीत गवई, राधिका दत्ता जासुद आणि कैलास गवई आढळून आले, तर साहील गवई घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पंचांसमक्ष कैलास गवई याने सोनोग्राफी करून गर्भातील बाळ मुलगा असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. त्यामुळे पथकाने घटनास्थळावरील साहित्य ताब्यात घेत पुढील कारवाई केली. चौकशीदरम्यान कैलास गवई याने अॅक्युपंक्चर विषयातील पदवी तसेच सन २०१९ पर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र सादर केले. मात्र सोनोग्राफी करून गर्भलिंग निदान करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय पात्रता त्याच्याकडे नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. कारवाईत टॅबच्या आकाराचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, त्यातील व्हिडिओ रेकॉर्डिंग, इंजेक्शन, सलाईन, आयव्ही सेट तसेच विविध औषधे जप्त करण्यात आली.नया कारवाईमुळे शहरालगत सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या प्रकाराला मोठा धक्का बसला असून, या प्रकरणाचा पुढील तपास बुलडाणा शहर पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!