मेहकर : मेहकर बायपासवर दुचाकीस्वाराला अडवून चोरांनी एक लाख रुपये नगदी व पाच हजार रुपयांचा मोबाईल चोरला. ही घटना १७ जुलै रोजी घडली. आरेगाव येथील संतोष उकंडा साखले व त्यांचे नातेवाईक हे दुचाकीवरून तळणी (ता. मंठा जि. जालना) येथे गेले होते. तळणी येथून नातेवाईकांकडून एक लाख रुपये घेऊन ते पुन्हा दुपारी आरेगावच्या दिशेने मार्गस्थ झाले. याच दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास मेहकर बायपासने जाताना वृंदावन हॉटेलजवळ एका अज्ञान व्यक्तीने पेट्रोलसाठी संतोष यांची दुचाकी थांबवली. दुचाकी थांबताच दबा धरून बसलेले त्या व्यक्तीचे इतर तीन साथीदार बाहेर आले. त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. चौघांनी संतोष यांच्या खिशातून एक लाख रुपये चोरले. तसेच पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेत तिथून पळ काढला. त्यानंतर पीडित संतोष यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे या घटनेचा तपास करत आहेत.