खामगाव : खामगाव-शेगाव मार्गावर भरधाव खासगी बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री घडली. लासुरा शिवारातील अन्नकुटीजवळ झालेल्या या अपघातामुळे मार्गावर काही काळ खळबळ उडाली. अपघातानंतर शेगाव ग्रामीण पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण वासुदेव गाळे (२६, रा. खार तळेगाव, ता. भातकुली, जि. अमरावती) हा खासगी बस क्रमांक एमएच ०९ एफएल ५१२७ घेऊन शेगावकडून खामगावच्या दिशेने जात होता. दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी रात्री ८.४१ वाजताच्या सुमारास लासुरा शिवारातील अन्नकुटीजवळ बसने समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच २८ एएम ७५५३ ला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार विजय लक्ष्मण सवडतकर (४४, रा. अमडापूर, जि. बुलढाणा) गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडले. अपघाताचे नेमके स्वरूप स्पष्ट करण्यासाठी खासगी बसमधील डॅशबोर्ड कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासले. त्याआधारे पोलिस कर्मचारी मंगलसिंग सोळंके यांच्या फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १०६(१), २८१, ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विनीत घाटोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत आरोपी बसचालक भूषण गाळे याला १५ सप्टेंबर रोजी पहाटे २.३३ वाजता अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या अपघाताचा पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत.