Headlines

मलकापूर आगाराचा भोंगळ कारभार? पासेस साठी रणरणत्या उन्हात विद्यार्थ्यांसह वयोवृद्धांची फरफट; मलकापूर आगार प्रमुखांनी धृतराष्ट्राचे सोंग घेतले आहे का?

मलकापूर : विद्यार्थ्यांच्या हातात शिक्षणाची स्वप्ने आणि एसटी पाससाठी हातात पैसे घेऊन मलकापूर आगारात येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना मात्र रणरणत्या उन्हात तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. मलकापूर आगारातील पास वितरण केंद्राबाहेरचे हे चित्र एसटी प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे लहान चिमुकले विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच वयोवृद्ध नागरिक उघड्यावर उभे असल्याचे दिसून येत आहे. मात्र या परिस्थितीकडे आगार प्रशासनाचे लक्ष आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
मलकापूर आगार प्रमुखांनी धृतराष्ट्राचे सोंग घेतले आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. कारण त्यांच्या डोळ्यांसमोरच विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिक उन्हात उभे असताना त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का? विद्यार्थ्यांसाठी सावलीची व्यवस्था, पुरेसे पिण्याचे पाणी, बसण्याची सुविधा अथवा पास वितरणासाठी योग्य नियोजन करण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना उन्हाचा सामना करावा लागत असल्याचे छायाचित्रातून दिसून येत आहे.
एसटीचा पास घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रशासनाला माहिती असतानाही गर्दीचे नियोजन आणि मूलभूत सुविधांची व्यवस्था का करण्यात आली नाही? असा प्रश्न पालक आणि नागरिक उपस्थित करत आहेत. विशेषतः लहान वयातील विद्यार्थ्यांना एवढ्या कडक उन्हात दीर्घकाळ उभे राहावे लागणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. उन्हामुळे एखाद्या विद्यार्थ्याला चक्कर आली, प्रकृती बिघडली किंवा उष्माघातासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच खबरदारी घेणे आवश्यक नाही का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. फक्त विद्यार्थ्यांना पास देणे एवढीच प्रशासनाची जबाबदारी आहे का? त्यांच्या सुरक्षिततेची आणि मूलभूत सुविधांची जबाबदारी नाही का? असा प्रश्न आता मलकापूर आगार प्रमुखांसमोर उभा ठाकला आहे. विद्यार्थ्यांची आणि वयोवृद्धांची होत असलेली ही गैरसोय तातडीने दूर करून पास वितरण केंद्रावर सावली, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि गर्दीचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
अनर्थ घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने आताच जागे व्हावे, अन्यथा “विद्यार्थी उन्हात उभे होते हे दिसत नव्हते का?” या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? अशी चर्चा मलकापूरमध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!