देऊळगावराजा : शेतात काम करताना क्षणभराच्या निष्काळजीपणाचीही मोठी किंमत मोजावी लागू शकते, याची जाणीव करून देणारी दुर्दैवी घटना देऊळगावराजा तालुक्यात घडली. जवळखेड शिवारात शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना १४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. मधुकर कडुबा कायंदे (वय ४५, रा. उंबरखेड) हे जवळखेड शिवारातील शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, शेतालगत असलेल्या शरद शेषराव कायंदे यांना मधुकर यांना साप चावल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ मधुकर यांच्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच रामेश्वर कडुबा कायंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मधुकर कायंदे हे शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. रामेश्वर कायंदे व शरद कायंदे यांनी त्यांना तातडीने मोटारसायकलवरून देऊळगावराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मधुकर कायंदे यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी रामेश्वर कडुबा कायंदे यांच्या तोंडी माहितीनुसार देऊळगावराजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग क्र. ३७/२०२६) करण्यात आली आहे. दाखल अधिकारी म्हणून एएसआय निलीमा जाधव यांनी कार्यवाही केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहेत.