रक्षाबंधनाच्या प्रवासाला निघालेल्यांवर बसस्थानकाचे छत कोसळले! शेगाव बसस्थानकात तीन महिला व तीन वर्षीय चिमुकला जखमी; जीर्ण इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
रक्षाबंधनाच्या प्रवासाला निघालेल्यांवर बसस्थानकाचे छत कोसळले! शेगाव बसस्थानकात तीन महिला व तीन वर्षीय चिमुकला जखमी; जीर्ण इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
शेगाव : रक्षाबंधनानिमित्त भावाच्या घरी जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांवर शेगाव बसस्थानकाच्या जीर्ण इमारतीनेच संकट कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी, २८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. बसस्थानकाच्या छताचे प्लास्टर अचानक खाली कोसळून तीन महिला व तीन वर्षीय चिमुकला जखमी झाला. या घटनेने बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली असून, जीर्ण झालेल्या बसस्थानक इमारतीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोमल गणेश बावस्कर (३५), रेखा रामदास बावस्कर (४०, दोघी रा. अंबोडा, ता. नांदुरा), रुद्र गणेश बावस्कर (३) व विमलबाई भिकाजी पवार (६०, रा. भिलखेड, ता. संग्रामपूर) हे रक्षाबंधनानिमित्त प्रवासासाठी शेगाव बसस्थानकात आले होते. बसची प्रतीक्षा करीत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि छताचे प्लास्टर त्यांच्या अंगावर कोसळले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. प्लास्टरच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना तत्काळ बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बसस्थानक पोलिस चौकीचे प्रमुख पोलिस अंमलदार श्याम आघाव, विजय तायडे, नीलेश तायडे तसेच बसस्थानक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.