Headlines

दूध घेऊन परतणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; दुचाकीस्वार भामट्यांचा यशोधरा नगरात धुमाकूळ

खामगाव : शहरातील यशोधरा नगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी दूध घेऊन घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तब्बल १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरवस्तीत सायंकाळच्या वेळेस घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, चोरट्यांनी अवघ्या काही क्षणांत सुमारे ७९ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला.
ही घटना २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ७.१५ वाजेदरम्यान घडली. शशीकला जनार्दन सपकाळ (वय ५६, रा. शंकर नगर, खामगाव) या दूध घेऊन घरी परतत असताना यशोधरा नगर परिसरात दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून समोरून आले. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीने संधी साधत सपकाळ यांच्या गळ्यातील जुने वापरते सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसकावून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला काही क्षण गोंधळून गेल्या. मात्र, तोपर्यंत दोन्ही आरोपी दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाले होते. चोरीस गेलेल्या मंगळसूत्राचे वजन अंदाजे १५ ग्रॅम असून त्याची किंमत ७९ हजार २४५ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शशीकला सपकाळ यांच्या फिर्यादीवरून खामगाव शहर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!