Headlines

आदर्श नगरातील तीन दरवाजे तोडून घरात प्रवेश; पोलिसांच्या सायरनने चोरट्यांची धावपळ, सीसीटीव्हीत कैद

खामगाव : कुटुंबियांसह बाहेरगावी गेलेले घर हेरून चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य केले. मध्यरात्रीच्या सुमारास तीन चोरट्यांनी घराचे तब्बल तीन दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि घरातील साहित्याची फेकाफेक करीत चोरी केली. मात्र, अचानक पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकू आल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. चोरीची ही घटना आदर्शनगर परिसरात उघडकीस आली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आदर्शनगर परिसरातील रहिवासी जसवंत चव्हाण हे कुटुंबियांसह पुणे येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. चोरट्यांनी घराचे तीन दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणात फेकाफेक करून त्यांनी चोरी केली. दरम्यान, परिसरातून पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकू आल्याने चोरट्यांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिस येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. विशेष म्हणजे, घराच्या विरुद्ध दिशेला असलेल्या एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांचा हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी करून चोरट्यांनी केलेली नासधूस आणि फेकाफेक केलेल्या साहित्याची पाहणी केली. दरम्यान, घरातून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!