Headlines

दोन टिप्परमध्ये तब्बल ८ ब्रास अवैध रेती; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

अंढेरा : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अंढेरा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन टिप्पर पकडले. वाकी बुद्रुक फाट्यावर पेट्रोलिंगदरम्यान केलेल्या या कारवाईत दोन्ही टिप्परमध्ये प्रत्येकी ४ ब्रास याप्रमाणे एकूण ८ ब्रास अवैध रेती आढळून आली. दोन टिप्परसह रेती असा तब्बल ४० लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७.२० वाजता अंढेरा पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना वाकी बुद्रुक फाट्यावर देऊळगाव महीकडून येणारे पांढऱ्या रंगाचे दोन टिप्पर संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलिसांनी इशारा करून दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये प्रत्येकी ४ ब्रास रेती आढळून आली. सदर रेती वाहतुकीबाबत आवश्यक परवानगी नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही टिप्पर ताब्यात घेतले.
या प्रकरणी टिप्पर क्रमांक MH १३ DQ ५२७८ चालक नितीन संजन इंगळे (वय २९, रा. भानखेड, ता. चिखली) याच्याविरुद्ध, तर दुसऱ्या टिप्पर क्रमांक MH २८ CF ८९५२ चालक सतीश चिंधाजी सरोदे (वय ३५, रा. नागणगाव, ता. देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८(७)(८) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई प्रभारी ठाणेदार भरत चपाईतकर, उपनिरीक्षक दिनेश घुगे, नितीन पुसे व अमोल रोरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास एएसआय गणेश देढे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!