Headlines

“आपण दोघे पळून जाऊन लग्न करू” असे म्हणत आयटीआयला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण; नळगंगा धरण परिसरात विनयभंगाचा आरोप

मोताळा : आयटीआय कॉलेजला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला दुचाकीवर बळजबरीने बसवत अपहरण केल्याची धक्कादायक घटना मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. आरोपीने मुलीला नळगंगा धरण परिसरात नेऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाविरुद्ध पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी २७ ऑगस्ट रोजी आयटीआय कॉलेजला जात होती. यावेळी तळणी येथील ज्ञानेश्वर संजय तायडे (वय २१) याने दुचाकीने तिचा पाठलाग केला. काही अंतरावर त्याने मुलीसमोर दुचाकी थांबवून, ‘आपण दोघे पळून जाऊन लग्न करू’, असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मुलीने विरोध केला असता आरोपीने तिचा हात पकडून तिला बळजबरीने दुचाकीवर बसवले. त्यानंतर मोताळा-डिडोळा शिवारातून तिला नळगंगा धरण परिसरात नेण्यात आले. तेथे आरोपीने तिच्याशी विनयभंग केल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे.
या घटनेप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी ज्ञानेश्वर तायडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १३७(२), ७४, ७८, ३५१(२), तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!