मोताळा : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दर्शन विष्णू सुरपाटणे याच्या आकस्मिक मृत्यूने सुरपाटणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मोताळा शहरातील गणपती नगर परिसरात ८ ऑगस्ट रोजी घडली.
शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास दर्शन सुरपाटणे हा मित्राची दुचाकी क्रमांक एमएच-२८-सीबी-२३५९ घेऊन घरी परतत होता. गणपती नगर येथील टी-पॉईंटवर अजय गाडे यांच्या घराजवळ तो पोहोचला असता समोरून येणाऱ्या एमएच-२८-एएफ-८५८३ क्रमांकाच्या दुचाकीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दर्शन रस्त्यावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी बुलढाणा येथील डॉ. चोपडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान १० ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकाची आई विजया विष्णू सुरपाटणे यांनी २० ऑगस्ट रोजी बोराखेडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी निष्काळजीपणे दुचाकी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लोकेश राकेश खंडारे (रा. गणपती नगर, मोताळा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ व १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक आडोकार करीत आहेत.