मलकापूर : दसरखेड टोलनाक्यावर वाहन सोडण्याच्या कारणावरून तीन जणांनी टोलनाका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. एवढेच नव्हे तर संतप्त आरोपींनी दोन टिप्पर टोलनाक्यावरील बाइक लाइनवरून चालवून नेल्याने ट्रॅक, ढापा व वायरिंगचे नुकसान झाले. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुपेन्द्रसिंग विजयकुमार भदोरिया (३५, रा. टोलनाका, दसरखेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता अर्जुन पाटील (रा. रणथम), शुभम कापसे (रा. वाघोळा) व विठ्ठल पाटील (रा. घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) हे टोलनाक्यावरील कार्यालयाच्या चेंबरमध्ये आले. यावेळी त्यांनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीस शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर आरोपींनी एमएच २८ बीबी ८१९८ व एमएच २१ एक्स ५३२९ क्रमांकाचे टिप्पर टोलनाक्यावरील बाइक लाइनवरून चालवत नेले. त्यामुळे ट्रॅक तुटून ढापा व वायरिंगचे नुकसान झाले. या नुकसानीची अंदाजे किंमत आठ ते दहा हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच आरोपींकडून टोलनाका कर्मचाऱ्यांना नेहमी शिवीगाळ केली जाते. ‘तुम्हाला नोकरी करायची असेल तर आमचे वाहन लवकर सोडावे लागेल’, अशा धमक्याही दिल्या जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी आरोपी अर्जुन पाटील, शुभम कापसे व विठ्ठल पाटील यांच्याविरुद्ध अप. नं. १०३/२०२६, कलम ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२)(३)-३(५) बीएनएस तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संदीप पवार करीत आहेत.