Headlines

मलकापूर बसस्थानकात मद्यधुंद इसमाचा धुमाकूळ; पाच एसटी बसच्या काचा फोडून ८० हजारांचे नुकसान, पोलिसांत गुन्हा दाखल!

मलकापूर : मलकापूर बसस्थानकात रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत एका इसमाने हातातील लोखंडी रॉडने एसटी बसच्या दर्शनी काचा फोडून धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारात पाच एसटी बसच्या काचा फुटून महामंडळाचे तब्बल ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या फिर्यादीवरून संबंधित इसमाविरुद्ध सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राज्य परिवहन विभाग, मलकापूर येथील सुरक्षा रक्षक संजय सुखदेव खंडागळे (वय ५७, रा. गोपाळकृष्ण नगर, मलकापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, खंडागळे हे मलकापूर बसस्थानकात रात्रीच्या राउंड ड्युटीवर असताना बस आल्याने स्थानकात झोपलेल्या प्रवाशांना उठवत होते. त्याचवेळी अचानक तोडफोडीचा आवाज आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी एक इसम हातात लोखंडी रॉड घेऊन बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसच्या समोरील दर्शनी काचा फोडताना आढळून आला. सुरक्षा रक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्याचे नाव विचारले असता त्याने संजय गवई असे नाव सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या हाताला झटका देत तेथून पळ काढला.

दरम्यान, संबंधित इसमाने MH40 Y-5830, MH14 BT-4356, MH40 AQ-6172, MH40 AQ-6442 आणि MH40 Y-5695 या पाच एसटी बसच्या दर्शनी भागातील काचा लोखंडी रॉडने फोडल्या. प्रत्येक बसच्या काचेची अंदाजे किंमत १६ हजार रुपये असून, एकूण सुमारे ८० हजार रुपयांचे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी संजय सुखदेव खंडागळे यांच्या फिर्यादीवरून कलम ३२४(४) बीएनएस तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!