वारी हनुमान येथे नदीच्या डोहात 22 वर्षीय युवक बुडून बेपत्ता

खामगाव : दर्शनासाठी वारी हनुमान येथे गेलेल्या खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथील २२ वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारी घडली. अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या तिघांपैकी दोघांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले; मात्र एक युवक पाण्याच्या खोल डोहात बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
खुटपुरी येथील योगेश प्रकाश वानखेडे (वय २२) हा दोन मित्रांसह वारी हनुमान येथे दर्शनासाठी गेला होता. दर्शन झाल्यानंतर तिघेही नदीतील डोहात अंघोळ करण्यासाठी उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडू लागले. घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ नदीकडे धाव घेतली. त्यांनी प्रयत्न करून दोघा युवकांना पाण्याबाहेर काढले. मात्र, योगेश वानखेडे याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. तो पाण्यात बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच हिवरखेड पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. तसेच तेल्हारा येथील आपत्ती व्यवस्थापन पथकालाही शोधकार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!