बुलढाणा : जानेफळ येथील इंदिरानगर परिसरात अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत सात देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी गोपनीय माहितीच्या आधारे इंदिरानगर परिसरात छापा टाकण्यात आला. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीदरम्यान विलास कंकाळ (रा. जानेफळ) याच्या ताब्यातून ९० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या सात बाटल्या व एक कॅरीबॅग असा एकूण २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विशाल धोंडगे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला बीएनएसएस २०२३ च्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, परिसरातील अवैध मद्यविक्रीविरोधातील कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.