शेगाव : किरकोळ कारणावरून ७० वर्षीय वृद्ध वडिलांना शिवीगाळ करून हात पिरगाळत मारहाण केल्याची घटना शेगाव तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोंद्राजी बाबन समदुर (७०, रा. गोळेगाव बुद्रुक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुनील बोंद्राजी समदुर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी हा त्यांचाच मुलगा असून तो नेहमी मद्यप्राशन करून वडिलांशी वाद घालत असतो. मंगळवारी सायंकाळी फिर्यादी यांनी बैलजोडीच्या भाड्यापोटी देवचंद समदुर यांच्याकडून ५०० रुपये घेतले होते. याच कारणावरून आरोपीने ‘तू देवचंदकडून पैसे का घेतले?’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर वडिलांचा हात पिरगाळून त्यांना दुखापत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.