शेगाव : शहरातील दसरा नगर परिसरातील तीन पुतळे भागात नगर परिषदेच्या सौंदर्यीकरण तलावात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. मोहम्मद अतहर मोहम्मद शहजाद (वय २१, रा. इदगाह प्लॉट, शेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास दसरा नगर परिसरातील तलावात एक युवक पडल्याची माहिती डायल ११२ वर देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी परिसरात नागरिकांसह नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. शोध घेतल्यानंतर मोहम्मद अतहर याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव येथे पाठविण्यात आला. या घटनेप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (भा. ना. सु. सं.) अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश गाडगे करीत आहेत.