चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; पाठलाग करून छेडछाड, चौघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा

सोनाळा :- कोचिंग क्लाससाठी प्रवास करणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा चालत्या बसमध्ये विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडितेचा पाठलाग करत बसमध्ये गैरवर्तन केल्याप्रकरणी चार युवकांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनी सोमवारी (दि. ८ जून) सकाळी कोचिंग क्लाससाठी बावनबीर येथून शेगावकडे जात होती. यावेळी चार आरोपींनी संगनमत करून तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. चालत्या बसमध्ये एका आरोपीने विद्यार्थिनीला वाईट हेतूने स्पर्श करून तिचा हात पकडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच इतर तिघांनी दुचाकी, ऑटो आणि बसच्या माध्यमातून विद्यार्थिनीचा पाठलाग करत मुख्य आरोपीला मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने तातडीने सोनाळा पोलीस पोस्ट गाठून तक्रार नोंदविली.
पीडितेच्या तक्रारीवरून प्रथमेश सुरेश महल्ले (रा. शेलू, ता. बार्शीटाकळी), सौरभ हटकर (रा. भेंडी सुत्र, ता. बार्शीटाकळी), कृष्णा संतोष गावंडे (रा. भेडगाव, ता. बार्शीटाकळी) आणि शिवा हटकर (रा. बावनबीर, ता. संग्रामपूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!