शेगाव : शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप करत तक्रारी दाखल केल्याने शेगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन प्रल्हाद तायडे (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रुख्माबाई तायडे, दशरथ करणकार, सहादेव करणकार, मुकेश सावळे आणि महादेव वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी शिवीगाळ करत विटा तसेच चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत अर्जुन तायडे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दुसऱ्या गटातील दशरथ महादेव करणकार (वय ३०) यांनीदेखील पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून यशवंत तायडे, अर्जुन तायडे, अनिता तायडे आणि दुर्गा सावळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, वादाच्या वेळी आरोपींनी चाकू व काठीने हल्ला करून तक्रारदारासह त्यांच्या नातेवाईकांना जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे म्हाडा कॉलनी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेतली असून प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत.