खामगाव : शहरातील अकोला रोडवरील मराठा हॉटेलसमोर उभी केलेली पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष प्रल्हाद राऊत (वय ३४, रा. सुटाळा बु., ता. खामगाव) यांनी याबाबत तक्रार दिली. २८ मे २०२६ रोजी दुपारी ३ ते रात्री ११.४० वाजेदरम्यान अकोला रोडवरील मराठा हॉटेलसमोर उभी केलेली त्यांची बजाज कंपनीची काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल (क्र. एमएच-२८-एई-०२६८) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत १२ हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. वाहन चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाची चक्रे फिरविली आहेत. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद शेळके यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भिमराव वानखेडे करीत आहेत.