जागेच्या बांधकामाच्या वादातून तिघांकडून हॉकी स्टिकने हल्ला; तिघे जखमी

शेगाव : जागेच्या बांधकामावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन तिघांना हॉकी स्टिक व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना शहरातील शिवनेरी चौक परिसरात घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी समीना बानो मुस्ताक खान (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती मुस्ताक खान यांनी आरोपी हमीद खान यास त्यांच्या जागेकडे बांधकाम का करीत असल्याची विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दरम्यान, वाद मिटविण्यासाठी गेलेल्या एजाज मुस्ताक खान यालाही आरोपींनी लक्ष्य केले. तक्रारीनुसार, आरोपी हमीद खान, आदील खान व मोहम्मद फैयाज हे हॉकीच्या लाकडी स्टिकसह घटनास्थळी आले. त्यांनी मुस्ताक खान व एजाज मुस्ताक खान यांना डोक्यावर, हातावर व पायावर हॉकी स्टिकने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी समीना बानो यांनाही धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!