मलकापूर : शेताच्या धुऱ्यावर असलेले लिंबाचे झाड तोडल्याची विचारणा केल्याचा राग मनात धरून एका शेतकऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना काटी येथे घडली. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहेबराव अजाबराव मुकुंद (वय ५५, रा. काटी, ता. नांदुरा) यांचे शेत आरोपींच्या शेतालगत आहे. ३ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ते शेतात गेले असता धुऱ्यावर असलेले त्यांचे लिंबाचे झाड तोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शेजारील शेतकरी सुधाकर दामोदर हिवाळे व सुभाष दामोदर हिवाळे (दोघेही रा. काटी, ता. नांदुरा) यांना जाब विचारला. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. आरोपीनं संतापाच्या भरात शिवीगाळ करत फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच लिंबाच्या काठीने मानेवर व उजव्या हाताच्या मनगटावर मारहाण करून जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अप. क्र. ११६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.