मेहकर : घरातील कुलरमध्ये पाणी टाकत असताना विद्युतप्रवाहाचा जोरदार धक्का लागल्याने २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी शहरातील रामनगर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव शिंदे (वय २४) हा युवक गुरुवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास घरी जेवण करत होता. प्रचंड उष्णतेमुळे घरातील कुलरमध्ये पाणी टाकण्यासाठी तो गेला. यावेळी कुलरमध्ये अचानक विद्युतप्रवाह उतरल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की गौरव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. तरुण वयात झालेल्या या आकस्मिक मृत्यूमुळे रामनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गौरव यांच्या निधनाने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी आवश्यक कार्यवाही केली.