बुलढाणा : प्रवाशांच्या सुरक्षिततेचा दावा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्येच एका महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मलकापूर येथील ३१ वर्षीय महिलेने बस वाहकाकडून धक्काबुक्की व गैरवर्तन झाल्याची तक्रार दिल्यानंतर बोराखेडी पोलिसांनी संबंधित वाहकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ९ मे रोजी मलकापूर येथून वैजापूरकडे एसटी बसने प्रवास करीत होती. दुपारी सुमारे सव्वाबारा वाजेच्या सुमारास मोताळा बसस्थानक परिसरात बसमधील वाहकाने महिलेजवळ बसत अंगलट येत वारंवार धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. महिला यांनी “व्यवस्थित बसा, धक्का मारू नका,” अशी समज दिली असता देखील संबंधित वाहकाने गैरवर्तन सुरूच ठेवत तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर महिला जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत असताना वाहकाने “असे धक्के लागतच असतात” असे म्हणत प्रकार हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला. तसेच नंतर महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधून “तुझा व्हिडिओ काढला आहे” अशी धमकी देत संभाजीनगर येथे भेटण्यासाठी दबाव टाकल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. महिलेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी संबंधित एसटी वाहकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेका अमोल खराडे करीत आहेत.