Headlines

भरधाव एसटी बसचा कहर; महामार्गालगत उभ्या दुचाकींचा चक्काचूर; अवकाळी पावसापासून बचावासाठी थांबलेल्या प्रवाशांचा थोडक्यात जीव वाचला

चिखली : अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या कडेला आश्रय घेतलेल्या प्रवाशांच्या दुचाकींवर भरधाव एसटी बस घुसल्याने गुरुवारी दुपारी चिखली-बुलढाणा मार्गावरील हातनी फाट्याजवळ भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत तब्बल १० ते १५ दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने जोर धरल्याने महामार्गावरून प्रवास करणारे अनेक दुचाकीस्वार हातनी फाट्याजवळील एका बंद हॉटेलच्या परिसरात थांबले होते. पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या होत्या, तर स्वतः झाडाखाली आणि सुरक्षित जागी उभे राहिले होते. दरम्यान, चिखलीहून बुलढाण्याकडे जात असलेली भुसावळ आगाराची एसटी बस (क्रमांक एमएच २० बीएल २९९२) भरधाव वेगात येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली बस थेट रस्त्याच्या खाली उतरली आणि कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर धडकली. बसच्या जोरदार धडकेत अनेक दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला. घटनेच्या वेळी दुचाकीस्वार वाहनांपासून दूर असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. काही क्षणांचा फरक पडला असता तर गंभीर जीवितहानी झाली असती, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त एसटी बस चिखली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!