दवाखान्यात जाते म्हणत घराबाहेर पडलेली तरुणी बेपत्ता; मलकापुरातील घटना

मलकापूर : दवाखान्यात जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडलेली २३ वर्षीय तरुणी परत न आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी २३ एप्रिल रोजी सकाळी मलकापूर येथे दवाखान्यात जाण्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक व परिसरात शोध घेतला, तरी तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर वडिलांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हरवलेल्या तरुणीचे वर्णन गोरा रंग, सुमारे ५ फूट उंची, मध्यम बांधा, लांब काळे केस असे असून ती घरातून निघताना गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला होता.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन पाटील करीत असून, सदर वर्णनाची तरुणी आढळून आल्यास तात्काळ मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!