शेगांव :- खामगाव-शेगाव मार्गावरील वाटिका चौकातील माने चौपाटी येथे बुधवारी सायंकाळी भीषण आग लागून आठ दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास एका खाद्यपदार्थांच्या दुकानात स्वयंपाक सुरू असताना अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने विकराळ रूप धारण केले. त्यातच शेजारील फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली आणि लागोपाठ असलेल्या दुकानांमध्ये झपाट्याने पसरली. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोन अग्निशमन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत चौपाटीवरील आठ दुकाने जळून खाक झाली होती. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत गर्दी पांगवली व वाहतूक सुरळीत केली. सायंकाळची वेळ असूनही त्या वेळी गर्दी कमी असल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येत आहे.