धार्मिक स्थळही असुरक्षित; देवीच्या मूर्तीवरील चांदीचे डोळे चोरी, दानपेटीही फोडली! डोणगाव तालुक्यातील घटना

डोणगाव :- तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे शेतात स्थापित केलेल्या येडेश्वरी देवीच्या मूर्तीवरील चांदीचे डोळे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागोराव रामकिसन आखरे यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या शेतात देवीची मूर्ती स्थापन केली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मूर्तीला सुमारे साडेसात तोळ्यांचे चांदीचे डोळे बसवले होते. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पूजा करून ते घरी परतले; मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात गेल्यावर मूर्तीवरील चांदीचे डोळे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याचबरोबर मंदिरातील दानपेटीही फोडण्यात आली असून त्यातील सुमारे दोन हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. या घटनेत एकूण सुमारे २२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर आखरे यांनी परिसरात शोध घेतला; मात्र काहीच धागेदोरे न मिळाल्याने त्यांनी डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
धार्मिक स्थळाला लक्ष्य केल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!