Headlines

१० हजारांची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; गावठाण फेर रद्द करण्यासाठी मागितले होते ३० हजार; खामगाव पंचायत समितीत रंगेहात कारवाई

बुलढाणा : गावठाण जमिनीच्या नोंदीत फेरफार करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या खामगाव तालुक्यातील गारडगाव येथील ग्रामसेवकाला बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवार, २ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालय, खामगाव येथे करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गारडगाव (ता. खामगाव) येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजय माधव गवई यांनी तक्रारदार शेतकऱ्याच्या गावाबाहेरील गावठाण शेतातील जागेची नमुना ८-अ नोंद रद्द करून दुरुस्तीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. या मागणीबाबत संबंधित शेतकऱ्याने बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीने २५ मार्च रोजी पडताळणी कार्यवाही केली असता, ग्रामसेवक विजय गवई यांनी नमुना ८-अ नोंद रद्द करून दुरुस्ती अहवाल पाठविण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पुढे तडजोडीअंती त्यांनी १० हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविली.
यानुसार एसीबी पथकाने सापळा रचून २ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालय, खामगाव येथे १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना विजय गवई यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा एसीबीचे पोलिस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलिस निरीक्षक विलास गुसिंगे, पोहेकॉ दिपक जाधव, पोना. जगदीश पवार, पोकाँ. रंजीत व्यवहारे, शैलेश सोनवणे, चापोहेकॉ नितीन शेटे व अर्शद शेख यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!