मलकापूर :- तालुक्यातील घिर्णी व बेलाड गावांमध्ये सतत खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, वसंता बाबुराव चित्रंग यांच्या नेतृत्वाखाली बेलाड उपकेंद्रासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिनाभरापासून सिंगल फेज लाईन दररोज दीर्घकाळ बंद राहत असून, थ्री फेज वीजपुरवठाही नियमित नसल्याने शेती, घरगुती कामे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः शेतीसाठी पाण्याचा पुरवठा खंडित झाल्याने पिकांचे नुकसान होत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच थ्री फेज लाईनवरील तारा जास्त भारामुळे वारंवार ट्रिप होत असल्याने वीजपुरवठा अधिकच विस्कळीत होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. परीक्षांचा काळ सुरू असताना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक वीज मिळत नसल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. २९ मार्चपासून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असला तरी परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचेही सांगण्यात आले.
या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, उपाध्यक्ष बाळूभाऊ ठाकरे, तालुकाध्यक्ष गोपाल सातव यांच्यासह अमोल चोपडे, धनराज ढोन, गजानन चोपडे, अनंता तांगडे, प्रशांत संबारे, तुळशीराम चोपडे, कृष्णा चव्हाण, संतोष चोपडे, भागवत भोपळे, विष्णू सुशीर, राजू भोपळे, सुरेश चोपडे, महादेव बगाडे, शिवलाल बघे, ज्ञानेश्वर संबारे, कडू संबारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी सिंगल फेज व थ्री फेज वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.