मेहकर तालुक्यात अवैध अफू लागवडीचा पर्दाफाश; १.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त

 

मेहकर : – तालुक्यातील पांग्री काटे शिवारात सुरू असलेल्या अवैध अफू लागवडीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडीत अंदाजे १ कोटी ३२ लाख ९ हजार ४०० रुपये किमतीची अफूची झाडे व बोंडे जप्त करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीनुसार पोलिसांचे पथक सोमवारी रात्री गस्त घालत असताना संबंधित शेतावर छापा टाकण्यात आला. गट क्रमांक १४८ व १२८ मधील शेतीत मोठ्या प्रमाणावर अफूचे पीक घेतल्याचे आढळून आले.
भागवत सदाशीव काटे यांच्या शेतातून सुमारे १०७ किलो ६६० ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून त्यांची अंदाजित किंमत ८६ लाखांहून अधिक आहे. तसेच विशाल रमेश काटे यांच्या ताब्यातून ५७ किलो ३२० ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली, ज्यांची किंमत सुमारे ४५ लाखांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध साखरखेर्डा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एपीआय गजानन करेवाड, पीएसआय गणेश कड तसेच महसूल, फॉरेन्सिक आणि अंमली पदार्थ शोधक पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!