मलकापूर – शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासणारी संतापजनक घटना मलकापूर शहरात उघडकीस आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
34 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, समाधान इंगळे (वय 45, रा. मधुबन नगर) व अनिल थाटे (वय 47, रा. यशोधाम मलकापूर) या दोघांनी मुलाच्या परीक्षेतील यशाचे आमिष दाखवत “तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊ, पहिला नंबर आणू; त्यासाठी तू आम्हाला खूश ठेव” असे म्हणत मानसिक दबाव आणून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या आरोपींनी पीडितेवर वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे पीडिता मानसिकदृष्ट्या खचून गेली होती. अखेर तिने धैर्य एकवटून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना 10 सप्टेंबर 2024 ते 22 एप्रिल 2025 या कालावधीत बद्री अपार्टमेंट, मलकापूर येथे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या (BNS) कलम 64 (2)(m), 70(1), 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. कौळासे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, आज न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिक्षकांकडून विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार प्रकरणी दोन्ही शिक्षकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
