खामगाव : शासकीय कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की करीत त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याचा प्रकार संभापूर येथे सोमवारी घडला. यावेळी अवैध उत्खनन केलेली अंदाजे दीड ब्रास रेतीही संबंधितांनी घेऊन गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. मंडळ अधिकारी आत्माराम तोताराम इतवारे (४८) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, गणेश लहेनसिंग पवार, अजय वसंतसिंग पवार व त्यांचा एक अनोळखी चालक, सर्व रा. संभापूर, हे शासकीय काम सुरू असताना तेथे आले. पाहणी सुरू असताना त्यांनी कामात अडथळा निर्माण केला. यावेळी मंडळ अधिकारी इतवारे यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, संबंधितांनी अवैधरीत्या उत्खनन केलेली अंदाजे दीड ब्रास रेती चोरून नेल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणून त्यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), १३२, ११५ (२), ३५२, ३ (५) तसेच गौण खनिज अधिनियम १९५७ मधील कलम २१ (१) (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश जाधव करीत आहेत.