पेठ मोहल्ल्यात मुलांच्या वादातून दोन गट आमनेसामने; परस्परविरोधी गुन्हे दाखल

शेगाव : शहरातील पेठ मोहल्ला परिसरात मुलांच्या किरकोळ भांडणाचे रूपांतर दोन गटांतील हाणामारीत झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत दोन्ही बाजूंच्या व्यक्ती जखमी झाल्या असून शेगाव शहर पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांतील एकूण १८ जणांसह काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पेठ मोहल्ला येथे मुलांच्या भांडणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद वाढत जाऊन एकमेकांच्या घरासमोर शिवीगाळ, विटाफेक आणि मारहाणीपर्यंत पोहोचला. या घटनेत दोन्ही बाजूंच्या काही जणांना दुखापत झाली. पहिल्या प्रकरणात शेख मजिद शेख इसाक (३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सैयद नबाब, सैयद अफान, सैयद नासीर, सैयद जमीर, सैयद इरफान, सैयद अली, सैयद सलमान, सैयद समीर, सैयद अतिक, सैयद राजा यांच्यासह इतर पाच ते सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, आरोपींनी संगनमताने घरात प्रवेश करून शिवीगाळ केली तसेच दगड मारून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय घरासमोर विटाफेक करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तर दुसऱ्या प्रकरणात सैयद जमीर सैयद सैलानी (५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हनीफ कुरेशी, बिलाल कुरेशी, अबुअझर कुरेशी, हसन कुरेशी, मजीद कुरेशी, रशीद कुरेशी, समद कुरेशी आणि लतीफ कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी घरात घुसून शिवीगाळ केली, विटाफेक केली तसेच विटेने मारहाण करून फिर्यादीला जखमी केले. त्यांच्या पुतण्यालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी गुन्हे क्रमांक ३६४/२०२६ व ३६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन सोनटक्के व पोलीस उपनिरीक्षक भामोदकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास जीपीएसआय गजानन गावंडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!