ऑनलाईन आखीव पत्रिकांतील त्रुटींवर मनसे आक्रमक; ७ दिवसांत दुरुस्तीची मागणी

मलकापूर : शहरातील ऑनलाईन आखीव पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) संगणकीकरण प्रक्रियेत झालेल्या गंभीर तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला निवेदन देत संबंधित त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. अन्यथा सात दिवसांत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मलकापूर शहरातील आखीव पत्रिकांच्या संगणकीकरणादरम्यान अनेक ठिकाणी क्षेत्रफळातील तफावत, मालकांच्या नावांमधील बदल तसेच इतर तांत्रिक चुका आढळून येत आहेत. जुनी आखीव पत्रिका आणि ऑनलाईन उपलब्ध असलेल्या पत्रिकांमधील माहितीमध्ये मोठी विसंगती असल्याने मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. या त्रुटींमुळे नागरिकांना वारंवार भूमी अभिलेख कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून प्रशासनाच्या चुकीचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच कार्यालयातील अधिकाऱ्यांना एकाच वेळी विविध कामांची जबाबदारी देण्यात आल्याने कामकाजावर परिणाम होत असून मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
मनसेने शहरातील सर्व नजूल शीट क्रमांक व प्लॉट क्रमांकांचा डेटा पुन्हा तपासून ऑनलाईन प्रणालीतील क्षेत्रफळ व इतर नोंदींमधील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे. तसेच या गंभीर चुका घडण्यास जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने पुढील सात दिवसांत ठोस उपाययोजना करून सर्व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलकापूरच्या वतीने भूमी अभिलेख कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील, तालुका उपाध्यक्ष गणेश जैस्वाल, शहर उपाध्यक्ष निखील पोंदे, रितेश भोपळे, दुर्गेश ढोलकर, मोनू केने यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!