Headlines

सहीसाठी वणवण थांबवा; आठ दिवसांत कारवाई करा! ‘शासन आपल्या दारी’च्या तक्रारीवर अस्तित्व संघटना आक्रमक; तहसीलदारांकडून कारवाईचे आश्वासन, प्रेमलता सोनोने यांचा आंदोलनाचा इशारा

मलकापूर : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्रतिज्ञापत्रांवरील सहीसाठी नागरिक व महा-ई-सेवा केंद्र चालकांना होणाऱ्या कथित हेलपाट्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, याप्रकरणी आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा अस्तित्व संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष प्रेमलता सोनोने यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी गुरुवारी (१३ ऑगस्ट) तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केले. यावेळी संबंधित विषयावर सविस्तर चर्चा झाली असून, लवकरच या प्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेचा उद्देश नागरिकांना शासकीय सेवांसाठी अनावश्यक हेलपाटे मारावे लागू नयेत, हा आहे. मात्र, मलकापूर तहसील कार्यालयातील प्रतिज्ञापत्रांवरील सहीच्या प्रक्रियेबाबत महा ई सेवा संचालक व चालकांना तसेच नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल झाला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
तत्कालीन तहसीलदार राहुल तायडे यांच्या कार्यकाळात प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी अधिकृत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत करून घेण्यात आली होती. सदर यादीत अद्याप बदल झालेला नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. असे असताना अधिकृत अधिकार असलेल्या कर्मचाऱ्यांकडून सही करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सहीच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांशी संबंधित महिला कर्मचाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने बोलले जाते, कामासाठी पुन्हा-पुन्हा हेलपाटे मारावे लागतात, अशा तक्रारींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी करण्यात आली. अधिकृत अधिकार देऊनही जबाबदारी पार पाडली जात नसेल, तर संबंधित कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती तपासून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी भूमिका संघटनेने मांडली.
तसेच, विद्यमान अधिकृत कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना वेळेत सेवा मिळत नसेल, तर त्यांच्या प्राधिकृतीकरणाचा पुनर्विचार करून सहीचे अधिकार जबाबदार व कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना नव्याने प्रदान करावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तहसील प्रशासनाने दखल घेतली का, संबंधित कर्मचाऱ्यांना कोणत्या सूचना देण्यात आल्या आणि त्यानंतरही तक्रारी कायम का आहेत, याबाबतही संघटनेने प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘शासन आपल्या दारी’ ही केवळ घोषणा न राहता नागरिकांना प्रत्यक्ष सुलभ सेवा मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाने दिलेल्या अधिकारांचा वापर जनतेची कामे सुलभ करण्यासाठी झाला पाहिजे; नागरिकांची वणवण वाढविण्यासाठी नव्हे, अशी भूमिका प्रेमलता सोनोने यांनी यावेळी स्पष्ट केली. आठ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रेमलताताई सोनोने यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!