Headlines

डीपीची तार कापून चोरीचा प्रयत्न; छोटा हत्तीसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या महावितरणच्या डीपीवरील तार कटरच्या सहाय्याने कापून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी छोटा हत्ती वाहन, अॅल्युमिनियमची तार व तार कटर असा तब्बल ५ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांसह दोन अज्ञात आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रणथम येथील बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत ही घटना घडली. रणथम येथील रहिवासी जयदीप पंडीतराव पाटील (वय ५२) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, प्रतापसिंग सुरजसिंग बावरी (वय २०) व कपुरसिंग सुरजसिंग बावरी (वय २५, दोघेही रा. म्हाडा कॉलनी, मलकापूर) हे आपल्या दोन अज्ञात साथीदारांसह छोटा हत्ती वाहनातून रणथम येथे आले होते. रात्रीच्या सुमारास महावितरणच्या डीपीची तार कटरच्या सहाय्याने कापून चोरी करत असताना त्यांना पकडण्यात आले. कारवाईदरम्यान आरोपींकडून सुमारे ५ हजार ५०० रुपये किमतीची अॅल्युमिनियमची तार, १ हजार रुपये किमतीचा लोखंडी तार कटर तसेच एमएच-१२-टीव्ही-९०४३ क्रमांकाचे अंदाजे ५ लाख रुपये किमतीचे छोटा हत्ती वाहन जप्त करण्यात आले. एकूण ५ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एमआयडीसी मलकापूर पोलिसांनी दोघांसह दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!